योगेश खरे / झी 24 तास / नाशिक : Nashik District Bank :आता आम्ही करणार आहोत धक्कादायक गौप्यस्फोट नाशिक जिल्हा बँकेच्या जुलमी वसुली कारभाराचा. (Nashik District Bank's tyrannical recovery) लाखो रुपयांचे कर्ज थकवलं म्हणून गरीब शेतकऱ्यांवर बँकेने जप्तीची कारवाई केली. मात्र करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या 29 बड्या राजकीय नेत्यांना आणि आजी-माजी संचालकांना बँक कशी पाठीशी घालतेय, याचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. पाहूयात हा 'झी 24 तास'चा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या आदिवासी बहुल देवळा तालुक्यात ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करण्यात आला. नाशिक जिल्हा बँकेने जप्त केलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर्सचा लिलाव. थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने गोरगरीब शेतकऱ्यांचे 238 ट्रॅक्टर्स जप्त केले. जिल्हा बँक एवढ्यावरच थांबली नाही तर इतर 1 हजार 524 थकबाकीदार शेतकऱ्यांवर देखील मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. 


जिल्हा बँकेच्या अजब कारभाराची दुसरी बाजू


आता नाशिक जिल्हा बँकेच्या अजब कारभाराची दुसरी बाजू. शेतक-यांवर तातडीनं कारवाई करणारी बँक मात्र घोटाळेबाज राजकीय नेत्यांच्या पायाशी कशी लोळण घेते याचं धक्कादायक वास्तव 'झी 24 तास'च्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाले आहे. 


नाशिक जिल्हा बँकेत तब्बल 347 कोटी रुपयांचा कर्जवितरण घोटाळा झाला. बँकेच्या आजी-माजी संचालकांकडून हे आर्थिक नुकसान वसूल करण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे आणि हे आजी-माजी संचालक, आजी-माजी आमदारही आहेत. 


आजी-माजी संचालक, आजी-माजी आमदारांची नावे



यात विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून 1 कोटी 87 लाख रुपये
आमदार नरेंद्र दराडेंकडून 8 कोटी 89 लाख रुपये
आमदार दिलीप बनकरांकडून 8 कोटी 65 लाख रुपये
माजी मंत्री शोभा बच्छाव यांच्याकडून 2 कोटी 11 लाख रुपये
माजी मंत्री प्रशांत हिरेंकडून 11 लाख रुपये
माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्याकडून 7 कोटी 21 लाख रुपये
माजी आमदार शिरीष कोतवालांकडून 1 कोटी 98 लाख रुपये
माजी आमदार वसंत गितेंकडून 1 कोटी 87 लाख रुपये
अद्वय प्रशांत हिरेंकडून 8 कोटी 47 लाख रुपये
वैशाली अनिल कदम यांच्याकडून 8 कोटी 54 लाख रुपये. 
असे तब्बल 29 राजकीय नेते आणि 15 बँक अधिका-यांना जप्तीच्या नोटीसा देण्यात आल्यात. त्यांच्याकडून एकूण 182 कोटी रुपये वसूल करायचे आहेत.


नोटीशीला खुद्द सहकारमंत्र्यांकडून केराची टोपली


धक्कादायक बाब म्हणजे शेतक-यांवर निजामशाहीसारखी सुल्तानी गाजवणा-या जिल्हा बँकेनं या नेत्यांच्या नावानं काढलेल्या नोटीशीला खुद्द सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांनीच केराची टोपली दाखवत जप्तीला स्थगिती दिलीय. 


केवळ नाशिकच नव्हे तर राज्यातल्या सर्वच जिल्हा बँकेत बडे राजकीय नेते असलेल्या संचालक मंडळींनी असाच धुडगूस घातलाय. जिल्हा बँका हे राजकीय नेते आणि संचालकांची आर्थिक मलिदा लाटण्याची तिजोरी बनलीय. शेतक-यांचा घात करणा-या या बँकाचं रान कोट्यवधी रुपये थकवणा-या आणि घोटाळे करणा-या राजकीय नेत्यांसाठी मोकाट कुरण बनले आहे.