सतीश मोहिते, नांदेड, झी मीडिया : नांदेडमध्ये अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी अशी घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने कपडे, वह्या, पुस्तके न मिळाल्याने गळफास लावून शेतात आत्महत्या केली. मुलाच्या वडिलांनी देखील त्याच दोरीला गळफास लावून आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मिनकी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्या केलेला विद्यार्थी उदगीर येथील शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. शाळेला सुट्ट्या असल्याने तो आपल्या गावी राहायला आला होता. कपडे आणि वह्या, पुस्तके घेण्यासाठी त्याने वडिलांकडे हट्ट केला. दोन दिवसांनी देतो असं वडिलांनी सांगितलं. पण मी आजच उदगीरला जात असल्याने मला आजच द्या, असा तगादा त्याने वडिलांकडे लावाला. 


पण दोन एकर शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांकडे पैसे नव्हते. दोन दिवसाने घेऊन देतो म्हणून वडील त्याला सांगत होते. पण काल गुरुवारी सायंकाळी मुलाने शेतात जाऊन झाडाला गळफास घेतला. मुलाच्या शोधात वडील शेतात पोहोचले. मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून वडिलांनी गळफास सोडला आणि त्याच दोरीला स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने बिलोली तालुक्यात शोककळा पसरली आहे. 


वडिलांकडे पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी दोन दिवसांनी सगळ्या वस्तू घेऊन देतो, असा शब्द वडिलांनी मुलाला दिला. पण आपल्याला आजच हवं असा हट्ट त्याने केला. शेतकरी बाप मुलासाठी ते सहज घेऊ शकत नव्हता. मुलाने शेतात गळफास घेतला. वडिल मुलाला शोधत असताना हा धक्कादाक प्रकार त्यांच्या समोर आला. हतबल वडिलांनी मुलाच्या गळफासाची दोरी सोडून मुलाला खाली ठेवून त्याच दोरीने गळफास लावून घेतला, ही माहिती मयताचे भाऊ पंढरी पैलवार यांनी दिली आहे.