Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी नवनीत राणा भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. पण भाजपच्या या स्टार प्रचारक चक्क बंडखोराचा प्रचार करताना दिसतायेत. अमरावतीच्या दर्यापूरमधील एका बंडखोर उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या मैदानात उतरल्यात. दर्यापूरमध्ये महायुतीचे कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्याविरोधात बंडखोरी केलेल्या रमेश बुंदिले यांचा प्रचार करतायेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत राणांनी बुंदिलेंसाठी मतांचा जोगवा मागितलाच, शिवाय बुंदिलेंच्या व्यासपीठावरुन महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ आणि आनंदराव अडसुळांवर टीका केली. माजी आमदार रमेश बुंदिले यांनी भाजपसोबत बंडखोरी करत रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. राणा हे महायुतीत असताना देखील दर्यापूरमधून त्यांनी रमेश बुंदिलेंना रिंगणात उतरवलंय. रवी राणांच्या या कृतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापलेत. त्यांनी राणांना जाहीर तंबी दिलीय. (Star campaigner in Maharashtra Assembly Election Navneet Rana who is working against Mahayuti)


 


हेसुद्धा वाचा - फडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल


 


"महायुती मजबूतीने लढत आहे. महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकण्यातं काम करु नका. मी राणा परिवारालाही सांगतो की, तुम्ही महायुतीचे घटक आहात. महायुतीत सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलं आहे. सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजीत अडसूळदेखील आपल्याला हवे आहेत. म्हणून आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीत राहायचं आणि महायुतीच्या विरोधात काम करायचं हे कोणी करता कामा नये. मुख्यमंत्री म्हणून मी हे आवाहन करत आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


दरम्यान नवनीत राणांची भाजपमधून तर रवी राणांची महायुतीतून हकालपट्टी करण्याची मागणी तुषार भारतीय यांनी केलीये. तर आम्हाला वेगळा आणि त्यांना वेगळा न्याय का?.. असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या नवनीत राणा या गळ्यात भाजपचा गमचा घालून महायुतीचा उमदेवार सोडून बंडखोर उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरल्यात. त्यामुळे महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या राणांवर काय कारवाई होते याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलंय.