पोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगित
Police Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम
Police Bharti Maratha Candidates: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन व उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले होते. मराठा आरक्षणाचा लढा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजातील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आली आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती स्थगिती ठेवण्याचे आदेश 30 जुलैला अपर महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
राज्य पोलिस दलातील भरती प्रक्रियेत ‘एसईबीसी’ व ‘ओबीसी’ ऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता त्यांची प्रकरणे स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिले आहेत. त्यातून बृहन्मुंबई, लोहमार्ग, हिंगोली पोलिसांना वगळण्यात आले आहे. नाशिक जिल्हयातील तात्पुरत्या निवड यादीतील EWS प्रवर्गातील 6 पैकी 4 मराठा उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार दिल्याची माहिती मिळत आहे.
या निर्णयामुळं मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. तर, इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मात्र मोकळा ठेवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी 16 जुलैला जाहीर केल्यानंतर अशा उमेदवारांना हमीपत्र बंधनकारक करण्यात आले होते. मात्र काही विद्यार्थ्यांनी याला नकार दिल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची भरती थेट स्थगित करण्यात आली आहे.
मराठा समाजाचा उमेदवारांची निवड करण्याबाबत प्रवर्गाचा गोंधळ अद्याप सुरूच आहे. एसीबीसी किंवा खुला प्रवर्गापैकी एकाची निवड करण्यासंबंधात ईडब्ल्यूएस प्रवर्गातील एकाची निवड करण्याचे आदेश देण्यात आले होते. भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र घेण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र नाशिकमध्ये चार उमेदवारांनी यासाठी नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, आता शासन निर्णय होत नाही तोवर केवळ या उमेदवारांचे प्रशिक्षण स्थगित करण्याचे आदेश कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.