Maharastra Politics : `शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपने...`, सुप्रिया सुळेंची सडकून टीका
Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र, सुळे यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
Baramati Loksabha Election 2024 : पवारांचं होम ग्राऊंड असलेल्या बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची घोषणा झाल्याच्या काही मिनिटानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिल्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर झाली अन् सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. खुद्द अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या कुटुंबानं शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतलीय. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या दोघी उमेदवार असल्या तरी खरी लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. एकीकडे बारामतीकर धर्मसंकटात सापडले असताना आता सुप्रिया सुळे यांनी प्रचारास सुरूवात केली आहे. मुळशी तालुक्यात बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
देशाची सेवा अथवा विकास या हेतूने नव्हे तर शरद पवारांना संपवण्यासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. भाजप हे षडयंत्र माझ्या वहिनीच्या रूपाने साधू इच्छितो, असं मत शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी मांडलं. बारामती लोकसभेत भाजपने अजित पवारांना सुनेत्रा वहिनींना उमेदवारी द्यायला का भाग पाडले, हे अप्रत्यक्षपणे नमूद करताना सुळेंनी हे वक्तव्य केलं. यासाठी भाजपच्या नेत्यांनी बारामतीत येऊन केलेल्या वक्तव्याचा दाखला दिला. भाजपचं उद्धिष्ट विकासाचं मुळीच नाही, त्यांना तर फक्त शरद पवारांना संपवायचं आहे. हे मी सांगत नसून भाजपच्या नेत्यांनीच बारामतीत येऊन स्पष्ट केलं, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
भाजपने पवार कुटुंब फोडलं अन् बारामती लोकसभेत पवार विरुद्ध पवार अशी लढत लावली आहे. माझ्याप्रमाणेच सुनेत्रा वहिनींना ही पवार साहेब लेक मानतात. त्यामुळं आई समान वहिणींचा सन्मान आम्ही निवडणुकीत नक्कीच राखू. पण भाजप मराठी माणसांमध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी भाजून घेत असल्याचा आरोप सुळेंनी लावला. त्या मुळशी तालुक्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ताथवडे भागात प्रचार करताना त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जोरदार टीका केली.
दरम्यान, जनतेला 24 तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीचा नारळ फोडला होता. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बरोबर असणारी 80 टक्के सोबत आली असतील तर पक्ष चोरला किंवा चोरून नेला असं होऊ शकतं? असा सवाल देखील सुनेत्रा पवार यांनी विचारला होता.