कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : कोरोनाचं संकट कमी होत असतानाच आता स्वाईन फ्लूने डोकं वर काढलं आहे. मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे 11 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईनंतर आता ठाणेकरांचीही चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल 20 रुग्ण आढळले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक म्हणजे स्वाईन फ्ल्यूने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागान ही माहिती दिली आहे. या दोनही महिला ठाण्यातल्या कोपरी भागात राहाणाऱ्या असल्याची माहिती आहे. या प्रकाराने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून या भागात सर्व्हे करण्याचं काम आरोग्य विभागाने सुरु केलं आहे.


आतापर्यंत 600 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून सुदैवाने अद्याप कोणालाही स्वाईन फ्ल्यूची लक्षण आढळलेली नाहीत. 


मृत झालेल्यांमध्ये एकीचं वय 71 तर दुसऱ्या महिलेचे वय 51 वर्षे असल्याचं सांगण्यात आलं आहे. यातील पहिली महिला रुग्ण ही 14 जुलै रोजी उपचारांसाठी दाखल झाली. त्यानंतर 19 जुलैला तिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर दुसरी महिला ही 14 जुलैलाच खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा मृत्यु 18 जुलै रोजी झाला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 


जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे 20 रुग्ण आढळून आले असून यातील 15 जणांवर यशस्वी उपचार होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


स्वाईन फ्लू सोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण देखील वाढले असून ठाण्यात सध्या डेंग्यूचे 8 तर मलेरियाचे 14 रुग्ण अढळले आहेत.  या आजाराने एकाचाही मृत्यू झालेला नसल्याचं प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.