`आधार कार्ड`बद्दल हे फोन आले तर सावध राहा
बँक खातं आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या फेक कॉल्सवरून सध्या ग्राहकांची लुट सुरु आहे.
कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : बँक खातं आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या फेक कॉल्सवरून सध्या ग्राहकांची लुट सुरु आहे. ठाण्यातील कोपरी भागात तर महिन्याभरात अशा जवळपास ५० गुन्ह्यांची नोंद झालीय.
फेक कॉल्सवरून एटीएमचा पिन नंबर किंवा OTP नंबर मागणे, एटीएममध्ये छुप्या स्कॅनरच्या माध्यमातून कार्डची माहिती मिळवणे अशा अनेक मार्गांनी सध्या बँक ग्राहकांची लूट सुरु आहे. आणि आता तर आधार कार्डचे अस्त्र वापरलं जाऊ लागलंय. लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा नाहीतर तुमचे खाते बंद होईल अशी भीती घालणारे कॉल्स सध्या ग्राहकांना येत आहेत.
ग्राहकांच्या भीतीचा फायदा घेत त्यांचा खाजगी पिन नंबर विचारून त्याद्वारे खात्यातून पैसे लुबाडण्यासारख्या गुन्ह्यांची आता नोंद होऊ लागली आहे. ठाण्यातील कोपरी भागात तर दर दिवसाला २ ते ३ अश्या गुन्ह्यांची नोंद होत असून महिन्याभरात जवळपास ५० गुन्हे कोपरी पोलीस स्टेशन ला नोंदवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे .
तर याबाबत बँकांनीही लक्ष घालून गंभीर पावले उचलावीत तसंच लोकांनी अशा कॉल्सना प्रतिसाद देऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तर बँक अशाप्रकारे कोणतीही खाजगी माहिती फोनवर विचारत नसल्याचं बँकांनी स्पष्ट केलंय त्यामुळे ग्राहकांनी त्यांची कोणतीही खाजगी माहिती फोन कॉल्सवर शेअर करू नये असं आवाहन बँकांनी केलंय.
अशा फोन कॉल्समुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि भीती असून संबंधित यंत्रणांनी कठोर पावलं उचलली पाहिजेत पण सध्याच्या डिजीटल युगात आपल्या आजूबाजूला डिजीटल भामटेही आहेत याचं भान ग्राहकांनीही विसरू नये आणि सतर्क राहावं.