अमोल पेडणेकर, झी मीडिया, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दहीहंडीच्या (dahi handi 2022) दिवशी सार्वजनिक सुट्टीचे आयोजन केले आहे. तसेच सर्व उत्सव निर्बंधासह साजरा करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवनागी दिली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यानंतर आता ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मोठी घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार प्रताप सरनाईक गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करत आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणची गोविंदा पथके त्यांच्या दहिहंडी उत्सवाला हजेरी लावतात. त्यामुळे सरनाईक यांच्या दहीहंडी कार्यक्रमाकडे सर्वच गोविंदा पथके लक्ष ठेवून असतात. त्यामुळे कोरोनाच्या दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात प्रताप सरनाईक यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यासह मोठ्या बक्षिसांचीही घोषणा केली आहे. 


"गेल्या अनेक वर्षापासून वर्तक नगरच्या मैदानावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी दहिहंडी उत्सवाच्या आधी हिंदुत्वाचे सरकार आलं आहे. सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्बंधमुक्त सणांची घोषणा केली आहे. दहिहंडीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे," असे प्रताप सरनाईक म्हणाले.


"दोन वर्ष उत्सव न झाल्यामुळे गोविंदा नाराज होते. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे. जागतिक विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 21 लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक गोविंदा पथके येणार आहेत. येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पाच हजारांपासून 50 हजारांचे बक्षिस मिळणार आहे.  तसेच न्यायलयाने जी नियमावली घालून दिली आहे त्याचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे," असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.


माझ्या पॅम्प्लेटमध्ये बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो आहेत. प्रोटोकॉल नुसार मी हे फोटो लावलेले आहेत. त्यामुळे कुणाचे फोटो नाहीत हे म्हणणं चुकीचं आहे. हिंदुत्वाची दहीहंडी आहे. हिंदुत्वाच्या प्रेरणेनेच आम्ही पुढे जाणार आहोत, अशी आमदार प्रताप सरनाई यांनी दिली आहे. 


दहीहंडी ला क्रीडा प्रकारात मान्यता मिळावी तसेच हा राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला जावा अशी मागणीही प्रताप सरनाई यांनी सरकारकडे केली आहे. तसेच दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल सरकारचे आभार देखील मानले आहेत.