ठाणेकरांची सकाळ आणि संध्याकाळ वाहतूक कोंडीत, रुग्णांचे हाल
ठाणेकरांची तसेच या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांची सकाळ आणि संध्याकाळ अक्षरश: वाहतूक कोंडीत
कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाणेकरांची तसेच या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांची सकाळ आणि संध्याकाळ अक्षरश: वाहतूक कोंडीत जाते. घोडबंदर भागातल्या महामार्गाच्या मधोमध बॅरिकेड लावून मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे. आधीच घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी असते. आता त्यात मार्गिकेचा एक भाग अडविल्यामुळे कोंडीत आणखी भर पडली आहे. तीनहात नाका भागातून संध्याकाळी परराज्यांत जाणाऱ्या बसगाड्या सुटतात. त्याचा फटका या चौकातल्या वाहतुकीला बसतो. तीनहात नाका ते माजिवाडय़ापर्यंतच्या सेवा रस्त्यांवरही मेट्रोच्या कामामुळे कोंडी होऊ लागली आहे.
तर कासारवडवली ते वडाळा मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी तीन हात नाक्याच्या दिशेनं जाणाऱ्या उड्डाणपुलाशेजारीच मेट्रोचा खांब उभारण्याचं काम सुरू झाल्यानं कोंडीत भर पडण्याची शक्यताय. त्यासाठी उड्डाणपुलाला लागूनच खोदकाम सुरू करण्यात आलंय. या कामासाठी सहा मीटरचा रस्ता अडवून अडथळे बसविण्यात आले आहेत.