कपिल राउत, झी २४ तास, ठाणे : ठाण्याचं नाक कोणतं असा प्रश्न ठाणेकरांना विचारला तर उत्तर जुन्याजाणत्या ठाणेकरांकडून उत्तर असे कोर्टनाका परिसरातला ऐतिहासिक अशोक स्तंभ म्हणजे 'ठाण्याचं नाक'... ठाणेकरांसाठी आणि बाहेरगावाहून आलेल्यांसाठी ओळखीची ओळखीची खूण किंवा मैलाचा दगड म्हणजे अशोकस्तंभ. ठाण्यातील स्वातंत्र्यसैनिकांची आणि ठाणेकरांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढयातल्या योगदानाची आठवण करु देण्यासाठी या अशोक स्तंभाची उभारणी १९५२ मध्ये करण्यात आली होती. ३५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८३ मध्ये एका अवजड वाहनाच्या धडकेनं संपूर्ण ठाणेकरांच्या भावना निगडीत असलेला हा अशोकस्तंभ उद्धस्त झाला होता. पण आता ठाणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हा अशोक स्तंभ पुन्हा नव्या रुपात येतोय. भिवंडीतली अंजूर येथील कारखान्यात अशोकस्तंभाची उभारणी सुरु आहे. लवकरच अशोकस्तंभाची ठाण्यात उभारणी होणार आहे. कोर्टनाका चौक नूतनीकरणासाठी ६० लाखांची तरतूद ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली. 


सुमारे ३२ फूट उंच अशोकस्तंभ असून मूळ कलाशैलीचे भान राखण्यात आले आहे. या स्तंभाजवळच भारतीय राज्यघटनेची प्रतिकृतीही उभारण्यात येणार आहे. तर, एका कृत्रिम बेटावर तिरंगा हाती घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची प्रतिकृती उभारली जाणार आहे. अशोक स्तंभापासून नवी पिढीही प्रेरणा घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.