नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालना जिल्ह्यात एक हृद्य पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका निर्दयी बापाने आपल्याच तीन महिन्याच्या चिमुकलीची जमिनीवर आपटून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. 


नेमकी घटना काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावातील भांडखोरांना अद्दल घडवून त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पित्यानेच स्वतःच्या तीन महिन्याच्या मुलीला जमीनीवर आपटून तिची हत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना जालन्यातील केहाळ वडगाव गावात घडली आहे. या प्रकरणी मंठा पोलिसांनी मयत मुलीच्या पित्याला अटक केली असून त्याच्यावर मंठा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्नेहा चव्हाण असं हत्या करण्यात आलेल्या 3 महिन्याच्या मुलीचं नाव असून अविनाश चव्हाण असं आरोपी पित्याचं नाव आहे. अविनाश चव्हाण याचा गावातील काही ग्रामस्थांशी वाद झाला होता. या वादानंतर भांडखोरांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अविनाश चव्हाण यांनी घरात येऊन स्वतःच्या मुलीच्या पायाला धरून जमिनीवर आपटून तिला गंभीर जखमी केलं. 


गावकऱ्यांनी जखमी झालेल्या चिमुकलीला मंठा इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखवलं. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं चिमुकलीचा रस्त्यातच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंठा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.