`माझ्या राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही`: अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण
`माझ्या राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही`: अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण
मुंबई : सचिन वाझे प्रकरणाने राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरतेचं वातावरण निर्माण केलंय. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांडगी झाली. आता पुढे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नंबर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अलिशान अँटलिया या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर त्या प्रकरणात एपीआय सचिन वाझेला एनआयएने अटक केली. ज्या गाडीत स्फोटकं भरलेली होती त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पत मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं.
नेमकं त्यावेळी राज्याचे अधिवेशन सुरू होते. विरोधकांनी या मुद्यावर अधिवेशनात सरकारला उघडं पाडलं. त्याचबरोबर गृहविभागावर गृहमंत्री अनिल देशमुखांची पकड नसल्याचंही या घटनेनं दाखवून दिलं. अधिवेशन संपल्यानंतर या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारच अडचणीत असल्याचं चित्र उभं राहिलं. याप्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची आणि मुंबई पोलीस दलाची प्रचंड बदनामी झाली.
सरकारची प्रतिमा जपण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या बदलीवर हे प्रकरण थांबेल अशी शक्यता होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या गटबाजीबाबत जाहीर वक्तव्य केलं. तसंच पोलीस अधिकाऱ्यांकडून काही गंभीर चुका झाल्याची कुबुलीही त्यांनी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या विधानानंतर कदाचित त्यांना तात्काळ शरद पवारांनी दिल्लीला बोलवून घेतल्याची चर्चा आहे. दिल्लीत अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीत अँटलिया स्फोटक प्रकरणी शरद पवारांना सविस्तर माहिती दिली, तसंच राज्यातील इतर प्रश्नांची चर्चा झाल्याचंही अनिल देशमुख यांनी भेटीनंतर सांगितलं. आता त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्या राजीनाम्यांच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.