मुंबई : निसर्ग चक्रिवादळामुळं महाराष्ट्राच्या वाटेवर असणारा Monsooon 2020 मान्सून काही दिवस लांबणीवर गेला होता. पण, अखेर लांबणीची वाट धरलेला हा मान्सून राज्याच्या दिशेनं कूच करु लागला आहे. किंबहुना कोकणासह महाराष्ट्राच्या इतरही काही भागांमध्ये मान्सूननं हजेरी लावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलाबा वेधशाळेच्या उपमहासंचालकपदी असणाऱ्या कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबतची  सविस्तर माहिती देत राज्यात नेमका मान्सूनचा प्रवास कसा असेल याचा अंदाज वर्तवला आहे. 


सध्याचं वातावरण पाहता मान्सून दक्षिण कोकणाच्या बहुतांश भागात तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्याही काही भागात दाखल झाला आहे. मराठवाड्यात मान्सून दाखल झाला नसला तरी तिथं पाऊस मात्र सुरु झाला आहे. मागील २४ तासांत तिथं चांगला पाऊस झाला आहे. परिणामी येत्या दिवसांमध्ये हे चित्र पालटू शकतं. 


येत्या ४ ते ५ दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याशिवाय ४८ तासांत मुंबई आणि उत्तर कोकणसह बऱ्याचशा भागात मान्सून दमदार हजेरी लावेल. 



 


मान्सूनचा हा अपेक्षित प्रवेश पाहता यंदा सरासरीइतका पाऊस लागेल तसंच त्याचं वितरणही समान राहिल असा अंदाही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.