राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती : शासकिय तूर खरेदीत घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतीस काही पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर आपली तूर विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर सरकार कारवाई कधी करणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.


शेतकऱ्यांच्या नावावर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय तूर खरेदी योजनेत घोटाळा झाल्याची तक्रारी सागर हागावने या शेतकऱ्याने केली आहे. अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांचा त्यात सहभाग असल्याचा आरोप हागावणे यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या नावावर या तूरीची विक्रीकडून ते पैसे आपल्या खात्यात वळते केल्याचा दावा हागावने यांनी केला आहे. त्यांनी माहितीच्या आधिकारात शासकीय तूर खरेदीच्या व्यवहारांची माहिती गोळा केली आहे. या तूर विक्रीत सराकरची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप हागावने यांनी केलाय. 


अंजनगाव कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे तूरीची विक्री केल्याचा आरोप बाजार समिती संचालक उमेश काकडे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.


व्यापाऱ्यांनी मारला हात


अंजनगाव सुर्जी बाजार समितीतील संशयास्पद तूर विक्री प्रकरणाची बाजार समिती पातळीवर चौकशी केली जात आहे. खरं तर ही चौकशी पूर्ण करुन त्याचा अहवाल उपनिबंधक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे अपेक्षित होतं. मात्र, अद्यापही चौकशीचं गुऱ्हाळ सुरुचं आहे.


राज्य सरकारने तूर खरेदीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मार्फत शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली. मात्र काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर खरेदी करून त्याची सरकारी योजनेत विक्री केल्याच्या तक्रारी सरकारकडं दाखल झाल्या. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांना तुरुंगात डांबण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. मात्र अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे दोषींवर खरंच कारवाई होणार का? हाच खरा प्रश्न आहे.