अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महारांजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात राजकारण पेटले आहे. भाजप ( BJP ) सह सर्व पक्षीयांकडून राज्यपालांवर कडाडून टीका केली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) देखील राज्यपालांचा खरपूस समाचार घेतला. यानंतर आता खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याचा संताप व्यक्त केला आहे. महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणत  उदयनराजेंनी अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांविरोधात थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांविरोधात आपला निषेध नोंदवला. महाराजांचा अपमान होतो तेव्हा दुख वाटत नाही का? असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला.  महाराजांचा विचार जुना विचार म्हणता मग नवा विचार कोणता ते तरी सांगा असे उदयनराजे म्हणाले. राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजे चांगलेत आक्रमक झाले आहेत. 


महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन त्यांची प्रतिमा मलिन केली जात आहे. महाराजांचे विचार चुकीच्या  पद्धतीने नव्या पीढीसमोर मांडले जात आहेत. यामुळे याचा काय परिणाम होऊ शकतो याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 
महापुरुषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी तशा प्रकारचे कठोर कायदे तयार केले पाहिजेत. महापुरुषांप्रती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी उदयनराजे  भोसले यांनी केली आहे.