वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये (Muktai Nagar) सभा घेण्यावर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) ह्या ठाम असल्यामुळे वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.  सुषमा अंधार ज्या हॉटेलमध्ये थांबल्या आहेत. त्या हॉटेलच्या बाहेर साध्या वेशात पोलीस (Police) तैनात असल्याचं समजतंय. सुषमा अंधारे यांनीही नजरकैदेपेक्षा भयानक स्थिती असल्याचा आरोप अंधारे यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा अंधारे म्हणतात 'जीवावर उदार'
सुषमा अंधारे सभा घेण्यावर ठाम आहेत. मी जीवावर उदार आहे, माझा जीव घ्यायचा आहे तर घ्या, आता ज्या परिस्थिती मी आहे ती नजरकैदेपेक्षाही भयानक परिस्थिती असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. माझ्या अवतीभवती किमान 200 ते 250 पोलीस असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना माझी इतकी भीती वाटत असेल तर ये डर मुझे अच्छा लगा असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला आहे. 


ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड
सुषमा अंधारे जळगावमधील हॉटेल के पी प्राईडमध्ये आहेत. आणि हॉटेलबाहेर पोलिस छावणीचं रुप आलं आहे. जळगावात महाप्रबोधन सभेवरून राजकीय वातावरण तापलंय. सुषमा अंधारे यांच्या मुक्ताईनगर येथील महाप्रबोधनसभेला प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर ठाकरे गट  (Thackeray Group) आक्रमक झालाय. ही मुक्ताईनगर मध्ये सभा घेण्याच्या निर्णयावर ठाम असणाऱ्या ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांना मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरुय.


सभेला परवानगी नाकारली
एकनाथ खडसेंचा (Eknath Khadse) गड समजल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरमध्ये त्यांची सभा होणार होती. पण नेमकं त्याच सभेच्या वेळी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) मुक्ताईनगरमध्ये महाआरती करणार होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळं अंधारेंच्या सभेला जळगाव जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारलीय. सभेच्या ठिकाणचं स्टेज हटवण्यात आलंय.


शरद कोळी यांना भाषणबंदी
एवढंच नाही तर ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी (Sharad Koli) यांना जळगाव जिल्हा प्रशासनाकडून भाषणबंदी करण्यात आलीय. महाप्रबोधन यात्रेत त्यांनी प्रक्षोभक भाषण करत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांवर टीका केली होती. या टीकेबद्दल शिंदे गटाकडून पोलिसांना निवेदन देण्यात आलं होतं. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कोळींवर कारवाई केली.