Uddhav Thackeray : ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray Press Conference : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचा कामाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्मारकाची आज पाहणी केली.
Uddhav Thackeray on Balasaheb Thackeray Smarak : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या वास्तूच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली. या स्मारकाच्या कामाची शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पुढील वर्षी 23 जानेवारी 2026 ला जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसंच स्मारकाचं बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
23 जानेवारी 2026 पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतं आहे. त्याच्या आत आम्ही हे स्मारक त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी ठेवू. मी या वेळीही जनतेला आवाहन करतो आहे की आराखडा तयार झाला आहे. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत महाराष्ट्र पिंजून काढला. आपल्याकडे जुने फोटो, भाषणं, काही जुन्या बातम्या, लेख असतील त्याचे फोटो, बातम्या हे कृपा करुन आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते मार्गदर्शन करणारं साहित्य ठरेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण - उद्धव ठाकरे
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारलं की, या स्मारकाचं श्रेय कुणाला जाणार? त्यावर उद्ध ठाकरे स्पष्टच म्हणाले की, स्मारकाचं उद्घाटन करताना जे सरकार असेल त्यांना श्रेय जाईल. मी सरकार बदलणार, वगैरे काहीही म्हटलं नाही. श्रेयवादाची लढाई व्हायलाच नको. यात काय श्रेयाची लढाई लढायची? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आहेत असे कुणीही या स्मारकाचं श्रेय घेऊ शकत नाहीत. श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही. बाळासाहेबांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलं. ज्यांना बाळासाहेब काही देऊ शकले नाहीत त्यांनी स्मारकातून तरी काहीतरी घ्यावं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं उद्घाटन कुणाच्या हातून होईल? हा मुद्दा लांबचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर पत्रकारांनी विचारलं की, राष्ट्रीय स्तरावरचं हे स्मारक आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील का? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यावेळी जे पंतप्रधान असतील ते येऊ शकतील असं उत्तर दिलंय.