`मालवणचे पाप धुऊन काढायचे असेल तर..`; अरबी समुद्राऐवजी `या` ठिकाणी शिवस्मारक उभारण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी
Uddhav Thackeray Shivsena Demand: राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतानाच अरबी समुद्रामधील स्मारकाचाही उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने आपली भूमिका मांडताना केला आहे. या स्मारकाचं काम इंचभरही पुढे सरकलेलं नसल्याचं म्हटलं आहे.
Uddhav Thackeray Shivsena Demand: मालवणमधील राजकोट येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. रविवारी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर जोडे मारो आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भारतीय जनता पार्टीनं केलंल आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या सन्मानार्थ केलेल्या आंदोलनाला विरोध करणारं होतं, असं म्हणत ठाकरेंच्या सेनेनं सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. असं असतानाच ठाकरे गटाने आता अरबी समुद्रामधील स्मारकाऐवजी राजभवनाच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारावं अशी मागणी केली आहे.
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम पुढे सरकलेले नाही
"शिवरायांचा भव्य पुतळा कोसळून पडला व त्याविरोधात संताप व्यक्त करणाऱ्यां शिवप्रेमींना रोखले जात आहे. मालवणात भाजपचे गुंड शिवप्रेमींच्या अंगावर चालून गेले. या गुंडांनी पोलिसांना शिव्या घातल्या. फडणवीस हे अरबी समुद्रात शिवरायांच्या भव्य स्मारकाची घोषणा करून बसले आहेत. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समुद्रात या स्मारकाचे जलपूजनही झाले, पण या स्मारकाचे काम अद्याप एक इंचही पुढे सरकलेले नाही. या होऊ न शकलेल्या शिवरायांच्या स्मारकाचे राजकारण या मंडळींनी केलेच. ही काय शिवभक्ती झाली," असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने केला आहे.
मालवणचे पाप थोडे धुऊन काढायचे असेल तर...
"समुद्रातले स्मारक करता येत नसेल तर राजभवनाच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत शिवरायांचे भव्य स्मारक नक्कीच उभे करता येईल. महाराष्ट्राच्या मुळावर येणारे हे राजभवन व त्यांना पोसणारे पांढरे हत्ती हवेतच कशाला? शिवस्मारकासाठी आज तरी ती जागा योग्य आहे. मालवणचे पाप थोडे धुऊन काढायचे असेल तर राजभवनामागच्या समुद्रावर शिवस्मारकाची पायाभरणी लगेच व्हायला हवी. अर्थात ही मंडळी एकवेळ हा राजभवनाचा भूखंड अदानी किंवा लोढांना देतील, पण शिवस्मारकासाठी गुंजभर जमीनही ते देणार नाहीत आणि हे म्हणे शिवरायांचे भक्त," असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
नक्की वाचा >> 'शिंदे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबाला...'; 'गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल
भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचे ढोंग
"फडणवीस व त्यांच्या मिंधे सरकारने शिवरायांचा सन्मान तर केला नाहीच, उलट शिवरायांचा अवमान होत असताना आपली तोंडेही शिवून ठेवली. एकंदरीत छत्रपती शिवराय अवमान प्रकरणात भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचे ढोंग उघडे पडले. त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचे ब्रह्मचर्यही निघून गेले. शिवप्रेमींवर कायद्याचा बडगा उगारणारे मिंधे सरकार राज्यात आहे. हे शिवरायांचे राज्य म्हणता येणार नाही. शिवरायांनी महाराष्ट्राला शूर आणि मर्द बनवले. फडणवीस-मिंधे वगैरे लोकांनी महाराष्ट्राला लाचार, बेइमान, नामर्द बनविण्याचे ठरवले आहे. शिवरायांचा महाराष्ट्र हा असा नाही. गाढवांनी ब्रह्मचर्यही घालवल्यावर दुसरे काय घडायचे!