'शिंदे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबाला...'; 'गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Shivsena Slams Government: "भाजपाचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 2, 2024, 06:49 AM IST
'शिंदे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबाला...'; 'गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल title=
ठाकरेंच्या पक्षाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Shivsena Slams Government: "एक ब्रम्हचारी गाढवाशी झोंबता, हाणुनिया लाथा पळाले ते। गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले, झाले तोंड काळे जगामाजी।। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी एका ब्रह्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची कथा अत्यंत विडंबनात्मक पद्धतीने सांगितली आहे. हा अभंग रचताना तुकाराम महाराजांना मोदी, फडणवीस, मिंधे, केसरकर, शेलार, अजितदादा अशी भाजपची टोळी दिसत होती काय ते सांगता येणार नाही, पण हेच वर्णन या मंडळींनाही तंतोतंत लागू पडले आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 'सामना'मधून केली आहे.

विरोधासाठी विरोध करताना...

"महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडताच जनमत तापले आहे व जनतेने सरकारविरुद्ध आंदोलन सुरू केले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारला जोडे मारण्याचा कार्यक्रम झाला. लोकशाहीत अशी आंदोलने होणारच. भारतीय जनता पक्षानेही ती केली आहेत, पण आज त्यांचे सरकार राज्यात असताना त्यांना लोकशाही मार्गाने होणारी ही आंदोलने नकोशी झाली. ‘जोडे मारा’ आंदोलनात पोलिसांनी अडथळे आणले व मूर्खांचा कारभार असा की, छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी विरोधकांनी केलेल्या आंदोलनास विरोध किंवा प्रतिवाद म्हणून भाजपने एक फुटकळ आंदोलन केले. म्हणजे त्यांचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

तुमचे शिवप्रेम ढोंगी

"तुकोबांच्या अभंगातील ब्रह्मचाऱ्यांने गाढवही गमावले होते. भाजपने स्वतःचे गाढवपण सिद्ध करून आपले उरले-सुरले ब्रह्मचर्य गमावले आहे. फडणवीस वगैरे लोकांचे म्हणणे असे की, ‘मालवणमधील राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळून छिन्नविच्छिन्न झाला. त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली आहे. मग विरोधक आंदोलन का करीत आहेत? विरोधक राजकारण करीत आहेत.’ फडणवीसांनी राज्याच्या संस्कृतीचे गजकर्ण केल्यामुळे शिवरायांच्या सन्मानासाठी कुणी स्वच्छ राजकारण करीत असेल तर भाजपच्या सर्वांगास खाज का सुटावी? तुम्ही तुमचे खाजवत बसा. महाराष्ट्राला ज्ञान देण्याची गरज नाही. तुमचे शिवप्रेम किती ढोंगी हे वारंवार उघड झाले आहे," अशी टीका लेखामधून करण्यात आली आहे.

...म्हणजे औरंगजेबास महाराष्ट्रप्रेमी मानण्यासारखेच

"शिवरायांनी स्वराज्य म्हणजे महाराष्ट्र निर्माण केला व शिवरायांच्या प्रेरणेमुळेच आजचा महाराष्ट्र अखंड आहे. हा महाराष्ट्र विखंडित करावा व त्यातून विदर्भ वेगळा करावा हे भाजपचे राष्ट्रीय धोरण आहे. स्वतंत्र विदर्भाचा लचका तुटत नाही तोपर्यंत लग्नाच्या बोहल्यावर चढणार नाही अशी प्रतिज्ञा ज्या फडणवीसांनी केली ते शिवरायभक्त कसे मानायचे? महाराष्ट्राचे माजी भाजपाई राज्यपाल कोश्यारी यांनी जाहीर कार्यक्रमात छत्रपतींचा अवमान केला होता तेव्हा त्यांची बाजू घेऊन उभे राहिलेल्या मिंधे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबास महाराष्ट्रप्रेमी मानण्यासारखेच आहे," अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.