व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाबाचे दर वाढले, जाणून घ्या नाहीतर होईल फजिती
`व्हॅलेंटाईन डे`मुळे गुलाबाचे दर वधारले आहेत.
रविंद्र कांबळे, झी मीडिया, मिरज : 'व्हॅलेंटाईन डे'मुळे गुलाबाचे दर वधारले आहेत. हरितगृहातील डच गुलाबांना मुंबई आणि दिल्लीच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेतून रेल्वेने दिल्लीला गुलाबाची निर्यात होत असून स्थानिक बाजारपेठेत प्रति शेकडा 100 रुपयावरून 300 रुपयांवर दर पोहचला आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी हरितगृहातील गुलाबाच्या फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे मिरजेतून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला रेल्वेने फुलांची निर्यात सुरू आहे. दररोज पाठविण्यात येणाºया गुलाबाच्या फुलांचा दिल्ली आणि मुंबईत शीतगृहात साठा करण्यात येतो. थंड हवामानामुळे जानेवारी अखेरपासून दिल्लीला फुले पाठविण्यात येत आहेत. व्हॅलेंटाईन डेमुळे एरवी पाच रुपये दर असलेल्या लाल रंगाच्या डच गुलाबास पंधरा ते वीस रुपये दर मिळत आहे.
मिरजेतून दररोज सुमारे दोनशे बॉक्स गुलाबाची फुले दिल्लीला जात आहेत. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलाचे उत्पादन होत नसल्याने अन्य शहराच्या तुलनेत मागणी आणि दर जास्त असल्याने दिल्लीला गुलाबाच्या निर्यातीचे प्रमाण मोठे आहे.
फुलांचे दर घटल्याने हवालदिल फुले उत्पादक शेतकºयांना व्हेलेटाईन डेचा आधार मिळाला आहे. व्हॅलेंटाईन डेमुळे स्थानिक बाजारातही गुलाबाचा दर प्रति शेकडा १०० रुपयावरुन ३०० रुपयावर पोहचला आहे. जरबेरा व कार्नेशिया या फुलांचे दरही वाढले आहेत. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेसाठी मिरजेतून पाच हजार बॉक्स फुले दिल्लीला जातात. यावर्षी गुलाबाला चांगली मागणी आहे.
व्हॅलेंटाईन डेमुळे फुलांचा दर वधारला असून डच गुलाबास दहा रुपये दर मिळत आहे. मात्र प्रत्येकी चारशे फुले असलेल्या बॉक्सचा आकार मोठा असल्याने फुलांच्या बॉक्सला आकारमाना प्रमाणे १६० रूपये आकारणी करण्यात येते.
रेल्वे मालवाहतूकीत भाडेवाढीमुळे फुलांची निर्यात महागली आहे. दिल्लीला फुले पाठविण्यासाठी बॉक्सच्या आकाराऐवजी प्रतिकिलोप्रमाणे दराची आकारणी करण्याची निर्यातदारांची मागणी आहे.