गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान (Maharashtra Bhushan Award Ceremony) 14 जणांचा उष्माघाताने (heatstroke) बळी गेल्यामुळे राज्य सरकार (Maharashtra News) खडबडून जागं झालं आहे. राज्यात एकीकडे काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) कोसळत आहे तर दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 40 अंशापेक्षाही वर गेला आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच अशी परिस्थिती उद्धभवल्याने अनेकांनी चिंता व्यक्ती केली आहे. सरकारने उष्माघातापासून वाचण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. दुसरीकडे राज्यातील काही भागातील शाळांनादेखील (School) राज्य सरकारने शुक्रवारपासून सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षण मंत्र्यांच्या आदेशानुसार शुक्रवारापासून जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. अशातच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही आनंद झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आनंदात त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनाही सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेला सुट्टी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला, यावेळी विद्यार्थ्यांनी झिंगाट गाण्यावर जोरदार डान्स केला. यासोबतच विद्यार्थिनींनी फुगडी घालून सुट्टीचा आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या शिक्षकांनीही नृ्त्यामध्ये सहभाग घेतला.



विद्यार्थ्यांसोबतच्या शिक्षकांच्या नृत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांच्या नृत्याला त्यांच्या शिक्षिकेने साथ दिली. तसेच यावेळी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी उन्हात विनाकारण फिरू नये, नवनवीन पुस्तके वाचावे, असे आवाहन शिक्षकांनी विद्यार्थांना यावेळी केले.


दरम्यान, वाढत्या तापमानामुळे पालकवर्गाने विद्यार्थ्यांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात अशी मागणी केली होती. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याची दखल घेत गुरुवारी महत्त्वाची घोषणा केली. अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना 21 एप्रिलपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.



"महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहीत धरून शुक्रवारपासून मुलांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम अद्याप सुरू आहे, त्या वगळता बोर्डाच्या सर्व शाळांना सुट्टी असेल. 15 जूनला उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भातील शाळा 30 जूनला सुरू होतील," असे दीपक केसरकर यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.


सुट्टीत मुलांवर अभ्यासाचा बोजा नको - दीपक केसरकर


"सुट्टीच्या काळात शाळांमार्फत अतिरिक्त वर्ग किंवा उपक्रम राबण्यात येतात. ते सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रात राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुपारच्या सत्रात ते घेता येणार नाहीत. नववी आणि दहावीचे विद्यार्थी वगळता कोणत्याही वर्गाच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावू नये. कारण, उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, मुलांवर सुट्टीच्या काळात अभ्यासाचा बोजा देऊ नये," असेही दीपक केसरकर म्हणाले.