व्हिडिओ : ... आणि उदयनराजेंच्या डोळ्यांतून टचकन पाणी आलं!
... आणि उदयनराजे भावूक होऊन त्यांच्या डोळे पाण्यानं डबडबले
पुणे : तरुण-तडफदार, डॅशिंग अशी ओळख असलेले साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या डोळ्यांत चक्क पाणी आलंय. उदयनराजे पुण्यात आले होते. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर एक गाणं तयार केलंय. 'आले रे, आले रे, आले रे, आले रे, आले रे माझे राजे, आले रे उदयनराजे' म्हणत गर्जना करणाऱ्या या गाण्यात 'राष्ट्राचा एक हृदयाचा नेक... नाद नाही करायचा राजेंचा' असेही शब्द आहे... या गाण्याचा व्हिडिओ उदयनराजेंना दाखवण्यात आला... या गाण्याचे शब्द ऐकले आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमानं यावेळी उदयनराजे चक्क भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं... आपल्या शर्टाच्या बाहीनं डोळे पुसताना कार्यकर्त्यांनी त्यांना पाहिलं... आणि उदयनराजेंचं हे रुप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
उदयनराजे यांच्या एका कार्यकर्त्यानंच हे गाणं तयार केलंय. उदयनराजे गाडीत बसले असताना त्यांना हे गाणं ऐकवण्यात आलं... आणि उदयनराजे भावूक होऊन त्यांच्या डोळे पाण्यानं डबडबले... हे पाहून त्यांचे कार्यकर्तेही काही काळ स्तब्ध झाले.
कार्यकर्त्यांचं प्रेम की...
काही दिवसांपूर्वी 'फाईट' या सिनेमातल्या 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या वाक्यावर आक्षेप घेत उदयनराजेंच्या समर्थकांनी तोडफोड केली होती. साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात, असं म्हणत या कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक जिमी मोरे यांच्या कारची तोडफोडही केली होती.
तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर उपस्थित असताना त्यांच्याकडे पाहत, 'काही महिन्यांनी सगळ्यांचंच लग्न आहे. तेव्हा अक्षता टाका, संपल्या म्हणू नका', असं सूचक वक्तव्य करूनही उदयनराजे चर्चेत आले होते. साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी पुन्हा खासदार उदयनराजेंना मिळणार, अशी शक्यताही वर्तवण्यात येतेय.
खास गाणं उदयनराजेंसाठी
राष्ट्रात एक, हृदयाचा नेक
नाद नाय राजेंचा करायचा...
साताऱ्याचा शेर, मावळ्यांचा घेर
दम नाय कुणाचा लढायचा...
राज्याची शान, गरिबांचा मान
मोहोल झाला बघा बघ्यांचा...
आले रे आले रे आले रे आले रे आले रे माझे राजे...
आले रे आले रे आले रे आले रे आले रे उदयनराजे...