नाव सीता शेळके, काम... अक्राळविक्राळ आपत्तीनंतर `ती` ठरली देवदूत; वायनाडमध्ये महाराष्ट्राच्या लेकीला सलाम
Wayanad landslides : `कधी भाविनी वा; कधी रागिणी`... फोटो व्हायरल होणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची कामगिरी पाहून हे शब्द नेमके किती समर्पक आहेत याचाच अंदाज तुम्हालाही येईल.
Wayanad landslides : केरळच्या वायनाडमध्ये एका रात्रीत झालेल्या मृत्यूतांडवानं संपूर्ण देश हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि कैक कुटुंब उध्वस्त झाली, कैक क्षणात शून्यात गेली. अशा या केरळातील वायनाड भागात सध्या एकाच महिलेची चर्चा असून, या महिलेच्या कामगिरीनं सोशल मीडियावरही सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. फक्त वायनाडच नव्हे, तर संपूर्ण देश या महिलेला सलाम करत असून, महाराष्ट्राला या महिलेचा विशेष अभिमान आहे. कारण, ही आहे महाराष्ट्राची लेक सीता शेळके.
कोण आहेत सीता अशोक शेळके?
भारतीय लष्कराच्या सेवेत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यांचा नव्यानं उभारण्यात आलेल्या बेली पुलावर उभा राहिलेला एक फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या या महिला अधिकारी आहेत मेजर सीता अशोक शेळके. वायनाडमधील चूरमला येथे ओढावलेल्या अक्राळविक्राळ नैसर्गिक आपत्तीमधील बचाव पथकामध्ये पूल उभारण्याची जबाबदारी असणाऱ्या भारतीय लष्कराच्या तुकडीतील त्या एकमेव महिला अधिकारी. कामाप्रती असणारं समर्पण आणि कमालीच्या धाडसासाठी सध्या सीता शेळके यांचं सारा देश कौतुक करत आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.
मेजर सीता अशोक शेळके यांचा परिचय
मेजर सीता अशोक शेळके या मुळच्या महाराष्ट्रातील अहमदनगरच्या. सध्याच्या घडीला वायनाडमध्ये सेवा देणाऱ्या भारतीय लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधील 70 जणांच्या तुकडीतील त्या एकमेव महिला अधिकारी.
मद्रास सॅपर्स ही लष्कराची अशी तुकडी आहे, जी युद्धजन्य परिस्थितीमध्ये पुल बांधणी आणि तत्सम कार्याच्या माध्यमातून सैन्यासाठी वाट मोकळी करून देत लँडमाईन निष्क्रिय करण्यामध्ये या दलाची मोठी भूमिका असते. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी लष्कराची ही तुकडी बचावकार्यात सिंहाचा वाटा घेताना दिसते. केरळातील 2018 मधील महापुरावेळीसुद्धा या तुकडीनं मदतीचा हात दिला होता.
हे माझ्या एकटीचं काम नाहीच...
इथं मेजर सीता शेळके आणि त्यांच्या तुकडीनं वायनाडमध्ये प्रभावित क्षेत्राला जोडणाला पूल अवघ्या 16 तासांमध्ये उभारला आणि तिथं त्यांच्या धाडसी वृत्तीचं देशभरात कौतुक झालं. यावर प्रतिक्रिया देत मेजर शेळके म्हणाल्या, 'स्थानिक प्रशासकिय यंत्रणांसह मी या क्षणी आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाचेच आभार मानते. गावकरी, स्थानिकांचे विशेष आभार', असं म्हणताना हे यश आपल्या एकट्याचं नसून त्यात सर्वांचं मोलाचं योगदान असल्याचा सूर मेजर शेळके यांनी आळवला.
वायनाडमध्ये भूस्खलन प्रभावित क्षेत्रामध्ये कैक आव्हानं असतानाही मेजर शेळके आणि त्यांच्या तुकडीनं उपलब्ध वेळ आणि साहित्यात पूल बांधणीचं काम पूर्णत्वास नेत बचावकार्याला आणखी वेग दिला आणि त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण तुकडीवर देशवासियांनी कौतुकाचा वर्षाव केला.