नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद: आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास आमचे सरकार खासगी कारखान्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले. ते सोमवारी पैठण येते बोलत होते. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून पैठण येथून सुरुवात झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेला खासदार अमोल कोल्हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार आणि पक्षातील बडे नेते उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे सांगून तीन वर्ष उलटली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ याशिवाय, सत्तेत आल्यास स्थानिक कारखान्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देऊ, असेही त्यांनी सांगितले. सरकारी नोकऱ्यांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. मात्र, तरीही सरकार या जागा भरत नाही. आमचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये सर्व जागा भरून टाकू, असेही अजित पवार यांनी सांगितले. 


तर धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी भाजपच्या महाजनादेश आणि शिवसेनेच्या महाआशीर्वाद यात्रेवर टीका केली. दोन्हीही पक्षांच्या यात्रा मुख्यमंत्री बनण्यासाठी असल्याची टीका मुंडे यांनी केली. भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी आदिवासी समाजाचे खोटे प्रमाणपत्र काढून समृद्धी महामार्गात कोट्यवधी रुपये लाटले. त्यांना चौकशीची नोटीस आल्याने हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते भाजपात दाखल झाल्याची टीका मुंडे यांनी केली.