लॉकडाऊनबाबत केंद्र जो निंर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करू- राजेश टोपे
महाराष्ट्राला जास्त प्रमाणात लसी मिळायला हव्यात
जालना : सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला (Syrm Institute) हे पुण्याचे राहणारे असल्यानं लसीकरणासाठी त्यांनी झुकतं माप महाराष्ट्राला दिलं पाहिजे अशी विनंती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली आहे. मे जून महिन्यात देखील महाराष्ट्राला जास्त प्रमाणात लसी मिळायला हव्यात. त्यासाठी जी किंमत लागेल ती राज्य सरकार (Maharashtra Government) लगेच द्यायला तयार आहे असंही टोपे यांनी म्हटलंय. ते जालन्यात बोलत होते.
आज निधी उपलब्ध आहे मात्र लसी उपलब्ध नसल्याने लसीकरणाला गती नाही. बाहेरची लस देखील राज्याला उपलब्ध होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
जिनोमिक सिक्वेन्सीग करणं गरजेचं झालं असून कोरोनाचा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे हे कळणे गरजेचं आहे त्यामुळे यावर लागणारा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल असंही टोपे यांनी म्हटलं आहे.
देशात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता देशांत लॉकडाऊन लावावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. देशात लॉकडाऊन लावायचा की नाही ? हा केंद्राचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतल्यास त्यांचा निंर्णय सर्व राज्यांना पाळावाच लागतो. त्यामुळे राज्य देखील केंद्राचा आदेश पाळणार असून पंतप्रधान योग्य निंर्णय घेतील असंही टोपे यांनी म्हटलं आहे.