राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची उघडीप, तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता
पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. आज कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे
मुंबई : राज्याच्या विविध भागांत सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. आज कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून पश्चिम बंगाल, त्रिपुरापर्यंत विस्तारला आहे. हा कमी पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकणार आहे. यातच गुजरात परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळत आहे.
परिणामी राज्याचा अंतर्गत भागात पाऊस ओसरणार आहे. कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे कोकणात पोषक हवामान असल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.