Weather Update : मान्सूनमागोमाग थंडीही देतेय चकवा; राज्याच्या `या` भागात ऐन हिवाळ्यात पावसाचा इशारा
Weather Update : काय चाललंय काय? थंडी आली म्हणता म्हणता आता राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं नेमका कोणता ऋतू सुरुये हे लक्षात येत नाही.
Weather Update : यंदाच्या वर्षी राज्यात पावसानं काहीशी उशिरानं हजेरी लावली आणि मुख्य म्हणजे त्याचा मुक्कामही फार कमी काळासाठीच पाहायला मिळाला. इथं पावसासाठी राज्याचा बहुतांश भाग आसुसलेला असतानाच परतीच्या पावसाच्या बातम्या आल्या. पाहता पाहता हिवाळा सुरुही झाला आणि महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली. निफाडपासून पाचगणीपर्यंत गुलाबी थंडीचा अनुभव ऑक्टोबरच्या अखेरीपासून अनेकांनाच आला. कोकणातही परिस्थिती वेगळी नव्हती. अर्थात काही भाग मात्र याला अपवाद ठरला.
महाराष्ट्रात हिवाळा सुरु झाला, असं म्हटलं जात असतानाच आता ही थंडीसुद्धा चकवा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळच्या वेळी सुरु होणारी तापमानवाढ दुपारी शिगेला पोहोचत असून, त्यामुळं पावसासाठी पूरक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. तिथं अरबी समुद्रावरही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं राज्याच्या दक्षिण भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत उकाडा कायम...
मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये तापमानाच होणारी वाढ कायम राहणार असून हा उकाडा अडचणी निर्माण करताना दिसेल. त्यातच हवेतील आर्द्रतेमुळं उष्णतेचा दाह अधिकच जाणवणार आहे. शहरातील प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं दृश्यमानता कमी असेल याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी.
हेसुद्धा वाचा : Mumbai News : मुंबईतील बांधकामे बंद, फटाके उडवण्यासाठी फक्त 3 तास परवानगी, प्रदूषणाच्या विळख्यानंतर हायकोर्टाचे निर्देश!
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. ज्यामुळं कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही काही अंशांची वाढ पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्गापासून रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्येही जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. तर, विदर्भात मात्र पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा जाणवणार आहे.
देशाच्या उत्तरेकडे पडणार कडाक्याची थंडी...
देशात्या उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजेच पंजाबपासून अगदी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरपर्यंत थंडीचा कडाका दिवसागणिक वाढताना दिसणार आहे. या राज्यांच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये अंशत: हिमवृष्टी होऊ शकते. तर, मैदानी भागांवर गार वारे वाहणार असल्यामुळं इथं येणाऱ्या पर्यटकांना सुरेख वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.