तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : राजकारणाची. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात आज खासदार उदयनराजे एकीकडे आणि पक्षाचे अन्य नेते दुसरीकडे असं चित्र दिसलं. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांचे कौतुक करतानाच फसवाफसवी कराल तर आम्हालाही कळतं अशा शब्दांत इशाराही दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्याच्या विश्रामगृहात राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील हे दिग्गज नेते शरद पवारांची प्रतीक्षा करत होते, तेव्हा शरद पवार दुसऱ्या खोलीत खासदार उदयनराजे यांची भेट घेत होते. उदयनराजेंना भेटून काही वेळात पवार या नेत्यांना भेटायला आले तेव्हा पाठोपाठ उदयनराजेंही होते. पण शरद पवारांचं स्वागत होईपर्यंत काही क्षणच ते तिथं थांबले आणि आपल्या कार्यकर्त्यांना इशारा करून लगेच त्यांनी काढता पाय घेतला.


विश्रामगृहाबाहेर आलेले उदयनराजे अनावधानानं चुकून शरद पवार यांच्याच टोयाटो लेक्सस गाडीत बसण्याचा प्रयत्न करताना दिसले. परंतु, लगेचच आपली चूक त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर 'माझी आणि पवार साहेबांची एकच गाडी आहे' असं गमतीने म्हणत 'दोन्ही गाडीचा रंग सारखाच' असल्यानं ही चूक झाल्याचं त्यांनी म्हटलं. 


पवारांच्या भेटीबद्दल त्यांना विचारलं तेव्हा पवारांचं कौतुक करताना पवारांना इशाराही देऊन टाकला. शरद पवारांना कडकडून मिठी मारली. पवार साहेब खूप काम करतात, पण फसवाफसवी कराल तर आम्हालाही कळतं, असं उदयनराजे म्हणाले.


उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी शरद पवार वगळता राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांशी त्यांचा संवाद नाही. त्यातही सातारा जिल्ह्यातील शिवेंद्रराजे भोसलेंपासून ते रामराजे नाईक निंबाळकरांपर्यंत सर्व नेत्यांशी त्यांचा उभा वाद आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे कुणाकडून लढणार याची चर्चा सुरुच आहे.


राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर माजी खासदार श्रीनिवास पाटील आता राजकारणात पुन्हा सक्रीय झालेत. आज पवारांच्या दौऱ्यात त्यांची उपस्थिती नजरेत भरणारी होती. त्यातही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी असल्याचे संकेत त्यांनी दिल्यानं राजकीय चर्चेला आणखीच जोर चढला.


कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात आलेल्या शरद पवारांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील आगामी राजकारणाचे रंग ठळकपणे समोर आले. उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध लक्षात घेऊन पवारांनी राजे आणि त्यांच्या विरोधकांना वेगवेगळं भेटणं पसंत केलं. राजेंनीही पवारांची भेट घेऊन तूर्तास राष्ट्रवादीतच असल्याचे संकेत दिले, पण जाताजाता त्यांनी दिलेला इशाराही बरंच काही सांगून गेला.