महाराष्ट्रात कोणाला घातपात घडवायचा आहे? काल धुळे आज नांदेडमध्ये तलवारी जप्त
धुळ्यात काल ९० तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या त्या पाठोपाठ आज नांदेडमध्ये तलवारी जप्त
नांदेड : महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट रचला जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारणही तसंच आहे. काल धुळ्यात (Dhule) पोलिसांनी मोठ्याप्रमाणात तलवारी (Sword) जप्त केल्या होत्या. तर आज नांदेडमध्येही (Nanded) पोलिसांना तलवारी सापडल्या आहेत.
नांदेडमध्ये एका ऑटोतून 25 तलवारी नेल्या जात होत्या. शिवाजीनगर गुन्हे शोध पथकानं संशयावरून तपासणी केली असता या तलवारी आढळून आल्यात. गोकुळनगर भागात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय.
अमृतसरहून सचखंड रेल्वेनं तलवारी आणल्या गेल्या होत्या. केवळ विक्री करण्याच्या उद्देशानं तलवारी आणल्या होत्या की काही घातपाताचा कट होता, याची चौकशी पोलीस करतायत.
काल धुळ्यात सापडल्या होत्या तलवारी
त्याआधी धुळ्यात काल पोलिसांनी तब्बल 90 तलवारी जप्त केल्या. मुंबई-आग्रा हायवेवर पेट्रोलिंग करताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ गाडी पोलिसांना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने गाडी न थांबवता पुढे नेली, पोलिसांनी पाठलाग करुन गाडी अडवली. गाडीची झडती घेतली असता गाडीत तब्बल 90 तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली.
महाराष्ट्रात हिंसा घडवण्याचा कट रचला जात आहे का? इतक्या मोठ्या प्रमाणावर तलवारी कोण आणि का मागवत आहे? याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.