`चमको` मंत्र्यांना फडणवीसांची ताकीद, सत्तारांना तर भर बैठकीत झापले, कॅबिनेटमध्ये काय काय घडलं?
हायव्होल्टेज मंत्रिमंडळ बैठक, फडणवीस अब्दुल सत्तारांवर संतापले, नेमकं काय घडलं?
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असून आता मंत्रिमंडळाचाही विस्तारही झाला आहे. सरकार सत्तेवर आल्यापासून प्रसिद्धीसाठी मंत्र्यांनी घोषणांचा सपाटा लावला आहे. यावरून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उताविळ मंत्र्यांना ताकीद दिली आहे. फडणवीसांचा रोख हा पूर्णपणे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे होता.
फडणवीस सत्तारांवर का तापले?
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी सन्मान योजना सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यानंतर माध्यमांनीही शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेत वृत्त चालवलं. मात्र याबाबत मंत्रिमंडळात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत कोणतीही माहिती न देता कसा काय निर्णय जाहीर करता, असा सवाल करत फडणवीसांनी सत्तारांना धारेवर धरलं.
आपण कोणताही निर्णय जाहीर केला नाही आणि म्हणालो नाही तर यावर विचार सुरू असल्याचं म्हणत सत्तारांनी सारवासारव केली. मात्र मंत्र्यांनी अशा सवंग घोषणा करण्याआधी आमच्याशी चर्चा करा आणि परस्पर घोषणा करू नका, असं म्हणत फडणवीसांनी एकप्रकारे इशाराचा दिला आहे.
मंत्री प्रसिद्धीसाठी नवनवीन घोषणा करत आहेत त्यामुळे जनतेच्याही सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र या घोषणांची पूर्तता करताना सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळेच याची गंभीर दखल फडणवीसांनी घ्यावी लागली.