आशीष अम्बाडे, झी ४ तास, चंद्रपूर : ताडोबातील व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला जात आहे. यात मानव-वन्यजीव संघर्ष, कमी होणारं जंगल, जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वाढणारे वाघ अशा सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी हा अभ्यास केला जात आहे. देहरादून येथील वाईल्डलाईफ इन्स्टीट्युट ऑफ इंडिया संस्था याचा अभ्यास करीत आहे. विदर्भातील ताडोबा, मेळघाट, बोर, नवेगाव, पेंच, नागझिरा आणि उमरेड-कऱ्हाडला या व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला जात आहे. हा अभ्यास म्हणजे एकप्रकारचं संशोधन आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देहरादून इथली संस्था वाईल्डलाईफ इन्स्टीट्युट ऑफ इंडियाद्वारे हे संशोधन केलं जात आहे. सध्या विदर्भातील त्यातही प्रामुख्यानं ताडोबा प्रकल्पात वाघांचा प्रजनन दर अधिक आहे. ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात ८५ वाघ आणि २२ बछडे वास्तव्यास आहेत. या संख्येच्या तुलनेत त्यांना जंगल कमी पडू लागलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वाघ सात-आठ वर्षांचा झाला की, तो आपला स्वतंत्र अधिवास तयार करतो. हा अधिवास तयार करताना तिथं आधीपासून असलेल्या वयोवृद्ध वाघाला हाकलून लावतो. हा प्रकार अलीकडच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढला. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. एका क्षेत्रात दोन वाघ राहू शकत नाही. त्यामुळं एकाला बाहेर पडावं लागतं.


युवा वाघ आपली ''टेरोटेरी'' तयार करताना हाकलला जाणारा वृद्ध वाघ जंगलातून बाहेर पडतो. अशा स्थितीत तो जंगलाशेजारी असलेल्या गावाजवळ आश्रय घेतो. वृद्धत्वामुळं शिकार करणं अवघड होत असल्यानं तो गावातील गुरांची शिकार करतो, जंगलात जाणाऱ्या माणसांवर हल्ले करतो. जंगलाबाहेर पडणाऱ्या वाघांमुळं मानव-वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात मोठा आहे. तेंदू पानं, बांबू, जळाऊ लाकडं आणण्यासाठी जंगलात घुसखोरी करणाऱ्या माणसांवर हल्ले होतात. या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासावरून वाघांच्या संदर्भात योग्य नियोजन करणं सोपं होणार असल्याचे ताडोबाचे क्षेत्रसंचालक एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.



'वाईल्ड लाईफ इन्स्टीट्युट ऑफ इंडिया' या संस्थेसोबत यासंदर्भात वनविभागाचा करार झाला असून वाघांच्या अभ्यासाचा अहवाल येत्या काही महिन्यात सर्व व्याघ्र प्रकल्पांना सोपवला जाणार आहे. त्यामुळं वाघांचं संगोपन, त्यांची हाताळणी, सुरक्षा, प्रजनन, वाढलेली संख्या या सर्व गोष्टींचं नियोजन शक्य होणार असल्याचेही ते म्हणाले.