पुणे : 'सकल मराठा क्रांती मोर्चा' बुधवारी दुपारी ३ वाजल्याच्या दरम्यान 'मुंबई बंद' आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं. परंतु, त्यानंतरही अनेक भागांत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचं हिंसक आंदोलन सुरूच होतं. आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा झाल्यानंतरही कळंबोली आणि कोपरखैरणे येथील मराठा आंदोलक काही केल्या माघार घ्यायला तयार नव्हते... या आंदोलना दरम्यान अनेक हिंसक घटनाही घडल्या. आंदोलनात राजकीय अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं, असा आरोपह समन्वयक समितीचे सदस्य वीरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत केला... तर या आंदोलनात काही अपिरिचित चेहऱ्यांनी घुसखोरी केल्याचा संशय माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. यानंतर या आंदोलनाला एका चेहऱ्याची आवश्यकता असल्याची गरज 'संभाजी ब्रिगेड'नं व्यक्त केलीय. मराठा समाजाच्या आरक्षणासहित विविध मागण्यांबाबत राजकीय नेत्यांवर विश्‍वास राहिला नसल्यानं आता खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजी राजे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व करावे, असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलंय. पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या या मागणीवर उदयनराजे आणि संभाजीराजे या दोघांनीही विचार करावा... त्यांचं नेतृत्व मिळालं तर आंदोलनाला नक्कीच फायदा होईल, असंही त्यांनी म्हटलंय. या आंदोलनात राज्य सरकारच्या आदेशावरून जवळपास ५००० कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आहेत... आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकार अधिकारांचा गैरवापर करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 


आंदोलन स्थगित झाल्यानंतरही हिंसा


गुरुवारी, आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा झाल्यानंतरही कळंबोलीत आंदोलकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर या आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले... तर कोपरखैरणेमध्ये आंदोलकांनी पोलीस चौकी जाळल्याची घटना घडली. या सगळ्या परिस्थितीमुळे नवी मुंबईत प्रचंड तणावाचे वातावरण होतं.