वाल्मिक जोशी, भुसावळ : कांद्याची वाहतुक करणाऱ्या किसान एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे आग लावण्याचा प्रयत्न एका महिलेकडून करण्यात आला. माचिसची जळती काडी बोगीत फेकून आग लावण्याचा प्रयत्न केल्‍याचा प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये (CCTV) कैद झाला आहे. बोगीला आग लागल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझविल्‍याने अनर्थ टळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगोल्याहून मुझफ्फरपूरकडे जाणाऱ्या कांदा वाहतुकीच्या रेल्वे वॅगनला आग लागल्‍याचा प्रकार घडला. ही गाडी सायंकाळी सातच्या सुमारास फलाट क्रमांक सातवर उभी असताना स्थानकावरील बोगींची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आली. 


इंजिनपासून पाचव्या क्रमांकाच्या बोगीतून धूर येत असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी ताबडतोब गाडीचे चालक व गार्ड यांना सूचना दिली. या वेळी फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी मदत केली.


किसान एक्स्प्रेस फलाट क्रमांक सातवर उभी असताना बोगीत आग लागताच रेल्वेस्थानकावर एकच धावपळ उडाली. या वेळी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी लागलीच बादल्यांनी पाणी फेकून आग विझविली. 


या वेळी आरपीएफ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. नेमकी आग कशी लागली, याची पाहणी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका माथेफिरू महिलेने आगपेटीची काडी पेटवून रेल्वेच्या डब्यात फेकल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. रेल्वे पोलीस या महिलेचा शोध घेत आहे.