गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : प्रत्येक निवडणुकीत उभा राहून पडण्याचा विक्रम करणारा अण्णू गोगट्या... या अण्णू गोगट्याला पु.ल.देशपांडेंनी 'अंतू बर्वा'मधून घराघरात पोहोचवला. यामध्ये आता आणखी एका 'अण्णू गोगट्या'ची भर पडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उत्तमराव कांबळे यांनी आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्तवेळा निवडणूक लढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांढरा सदरा, डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात रुमाल असा वेश परिधान करणारे उत्तमराव कांबळे आमदार नाहीत. पण शेंबाळपिंपरी मधील ग्रामस्थ त्यांना आदरानं आमदारच म्हणतात. याला कारणही तसंच आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते देशातील प्रत्येक निवडणूक लढवतात.. अगदी राष्ट्रपतीपदाची निवडणूक देखील... मात्र सूचक अनुमोदक न मिळाल्यानं त्यांना ही निवडणूक लढवता आली नाही.


उत्तम कांबळे यांनी आतापर्यंत ३० पेक्षा अधिक निवडणुका लढवल्यात. ६ वेळा ग्रामपंचायत, ४ वेळा तंटामुक्ती, ३ वेळा पंचायत समिती आणि एकदा जिल्हा परिषद, ६ वेळा विधानसभा, ४ वेळा लोकसभा लढवली आहे. सध्या कांबळे हिंगोली लोकसभा आणि वाशिम-यवतमाळ या दोन मतदारसंघातून उभे आहेत. कांबळेंनी राजकारणापायी आपलं सर्वस्व पणाला लावलं. कधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बकर्‍या विकल्या, तर कधी आईच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील मोडलं.


दांडगा जनसंपर्क असलेले आणि एमकॉमचं शिक्षण पूर्ण केलेल्या कांबळे यांना आतापर्यंत सर्वच्या सर्व निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला. पण त्यांनी कधी हार मानली नाही... एक दिवस तरी मतदार राजा जागा होईल आणि आपण लोकप्रतिनिधी होऊ, अशी भाबडी इच्छा कांबळेंना आहे.