राज्यात 24 तासात तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद ...महाराष्ट्र सरकार सतर्क
Coroan Cases in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. JN1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.
Coroan Cases in Maharashtra : बातमी सर्वांची चिंता वाढवणारी. केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाच्या (Corona) रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागलीये. आज दिवसभरात नवीन 14 रुग्णांची नोंद झालीय. यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 45 वर पोहचलीय. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कोरोनाचे 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय (Corona Active Patient) आहे. तर 23 जणांना होमक्वारंटाईन (Homequarantine) करण्यात आलंय. रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागल्यांन आरोग्य प्रशासनाची चिंता वाढलीय. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. कोविडच्या तपासण्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आलेत. दरम्यान केरळमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या JN-1 या नव्या व्हेरिएंटमुळे तिघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी तातडीनं बैठक बोलावलीये.
राज्यात अलर्ट जारी
केरळमध्ये कोरोनाची लाट आल्यानं महाराष्ट्रात सावधगिरी बाळगली जातेय. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अलर्ट जारी केलाय. केरळमध्ये कोरोना रूग्ण वाढल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पूर्वतयारी सुरु केली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी निवेदन जारी केलं आहे. राज्यात नियमितपणे जनुकीय क्रमनिर्धारण (W.G.S.) करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यामध्ये एक JN.1 या वेरीयंटचा रूग्ण सापडला आहे. हा रूग्ण सिंधुदुर्ग इथला 41 वर्षाचा पुरूष आहे. सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे असल्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय.
या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविले असून, रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या I.L.I आणि SARI रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबर सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्याचे सांगण्यात आले आहेत.
भारत सरकारच्या सूचनेनुसार, कोविडच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन पूर्वतयारीचा एक महत्वाचा भाग म्हणून राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे मॉकड्रील 15 ते 17 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आलं. हे मॉकड्रील यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विभाग आणि जिल्हा स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. राज्यातील सर्व जिल्हे, महानगरपालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या महत्वपूर्ण मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदविला.
रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयु, सुविधा, यंत्रसामुग्री, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडीसीनची सुविधा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला. राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.