मुंबईत २४ तासांत १३५ जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या २७९८वर
आज पालिकेने १४ ते १६ एप्रिल या काळात विविध खासगी लॅबमध्ये १५४ रूग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचीही माहिती जाहीर केली.
मुंबई: गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत कोरोनाचे १३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचार सुरु असलेल्या सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच आज पालिकेने १४ ते १६ एप्रिल या काळात विविध खासगी लॅबमध्ये १५४ रूग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचीही माहिती जाहीर केली. हे दोन्ही अहवाल मिळून मुंबईतील नव्या कोरोना रुग्णांचा आजचा आकडा २८९ इतका झाला आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २७९८ वर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये १३१ मृतांचा समावेश आहे.
देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचे नवे रुग्ण नाहीत
गेल्या काही दिवसांपासून विरोधक मुंबई महानगरपालिका कोरोना रुग्णांचा खरा आकडा लपवत असल्याचा आरोप करत आहेत. आज खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आल्याने विरोधकांच्या या दाव्याला बळ मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. आज याठिकाणी कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळून आले. पालिका प्रशासनाने धारावीतील अनेक परिसर सील केले आहेत. मात्र, तरीही दिवसागणिक धारावीतील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
कोविड हल्ल्यापूर्वी धर्म, जात, भाषा पाहत नाही: पंतप्रधान मोदी
धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३८ वर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत धारावीतील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळून आलेल्या २० नव्या रुग्णांमध्ये फातिमा चाळीतील सहा जणांचा समावेश आहे. यापूर्वी शनिवारी कल्याणवाडीमध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता धारावी परिसरातच कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट तयार होत असल्याची भीती आहे.