मुंबई : साधारण काही दिवसांपूर्वी मुंबईत पावसानं चांगलाच जोर धरला आणि पुन्हा एकदा या मायानगरीची तुंबई झाली. पावसाचा सातत्यानं वाढणारा जोर पाहता, त्यामुळं अपेक्षित असंच चित्र यंदाही मुंबईकरांना आणि साऱ्यांनाच पाहायला मिळालं. हे चित्र होतं ठप्प झालेल्या आणि तुंबलेल्या मुंबई शहराचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडं पाऊस मी म्हणत होता, तर याच वातावरणात दुसरीकडं ५ ऑगस्ट या दिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. अतिवृष्टीमुळं माटुंग्यात पाणी साचलं असल्यामुळं एक महिला रस्त्याच्या मध्ये उभी राहून वाहनांना जाण्यासाठीचा मार्ग दाखवत होती. ही महिला नक्की आहे तरी कोण, असाच प्रश्न मग नेटकऱ्यांनी उपस्थित केला आणि त्या प्रश्नाच्या उत्तराची उकल होताच अनेकांनी या महिलेला सलाम केला. 


कांता मूर्ती असं या महिलेचं नाव. त्या माटुंग्यातच एका फुटपाथवर राहतात. त्यांचे पती दिव्यांग आहेत.  हार, फुलं विकून उदरनिर्वाह करण्याचा त्यांचा दिनक्रम. पण, ५ ऑगस्ट या दिवशी पावसाचा जोर वाढला आणि माटुंग्यात बघता बघता पाणी साचू लागलं. हे चित्र पाहून कांता यांनी चक्क 'मॅनहोल कव्हर' उघडलं. 



रस्त्यावरील उघडलेल्या त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये म्हणून त्याशेजारीच कांता उभ्या राहिल्या. तब्बल आठ तास कांता पावसाच्या या साचलेल्या पाण्यात उभ्या होत्या. यामध्ये त्यांच्या घराचंही फार मोठं नुकसान झालं होतं. पण, तरीही स्वत:च्या घराची पर्वा न करता त्यांनी मुंबईकरांना वाट दाखवण्याची पाण्यात उभं राहण्याचा निर्णय घेतला. कांता मूर्ती यांच्यासारख्या अशाच मुंबईकरांमुळं हे शहर प्रत्येक वेळी संकटांवर मात करुन अधिक बळकटीनं उभं राहतं. त्यामुळं हेच मुंबईचे खरे 'हिरो' आणि 'हिरे' आहेत असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.