लॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशनवरवर हजारोंची गर्दी, आदित्य ठाकरेंचं मोदी सरकारवर खापर
वांद्रे स्टेशनवर हजारोंची गर्दी जमल्यामुळे खळबळ
मुंबई : देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्याआधी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं सांगितलं.
एकीकडे देशात आणि राज्यात लॉकडाऊन वाढवलेला असताना मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्टेशनवर हजारो लोकांनी गर्दी केली. उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ ठिकाणी पोहोचण्यासाठी येथे जमले होते. गावाला जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी या कामगारांनी केली होती.
शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्याचं खापर केंद्र सरकारवर फोडलं आहे. 'केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्रे स्टेशनबाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये झालेली दंगलही याचाच परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा घर नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे,' असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
'ज्या दिवसापासून ट्रेन बंद झाल्या तेव्हापासून आणखी २४ तासांसाठी ट्रेनसेवा सुरू ठेवावी, ज्यामुळे परराज्यातले कामगार त्यांच्या घरी परत जातील, अशी विनंती आम्ही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही हा मुद्दा उपस्थित केला होता. परराज्यातल्या कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी मोदींना केली होती,' असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.