आदित्य ठाकरे यांनी सांगितलं, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार किती काळ टिकेल?
राज्यातील महाविकास आघाडी सरकार किती काळ टिकेल याबाबत सरकार स्थापन झाल्यापासून चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार किती काळ टिकेल याबाबत सरकार स्थापन झाल्यापासून चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा पुन्हा सुरू झाली. मात्र हे सरकार ५ वर्ष टिकेल, शिवसेना विश्वासार्ह पक्ष आहे, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या या विधानाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता, आमचे सरकार हेरिटेज झाडाच्या वयाएवढे टिकेल, असं वक्तव्य त्यांनी केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांना हेरिटेज झाडाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तो धागा पकडून आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार हेरिटेज झाडाच्या वयापेक्षा जास्त काळ टिकेल असं वक्तव्य केलं.
एकीकडे शरद पवारांनी हे सरकार टिकेल असं विधान करून राज्यात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला होता. त्यात आदित्य ठाकरे यांनीही हे वक्तव्य करून महाविकास आघाडी सरकार दीर्घ काळ टिकेल असा दावा केलाय.