मुंबई : ती संघटना आहे की पक्ष आहे, मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे, असा खरमरीत टोला शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मनसेला (MNS) लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपली  प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतली जात आहे, असा गंभीर आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केला होता. फेरीवाले बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतात.  बाळासाहेबांचे फोटो लावून हे कृत्य करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देताना ही तर टाईमपास टोळी आहे, असे म्हटले आहे.


त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजपलाही चिमटा काढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला दिलेला सल्ला केंद्राला द्यावा, असे म्हटले आहे. जगभरातून किंवा आपल्या देशातून कोणीही ट्विट केले तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत का बोलत नाहीत?, असे यावेळी ते म्हणाले.


मुंबईकरांना मोठा दिलासा


दरम्यान, मुंबईतील विकासकामांचा मी पहाणी दौरा करत असतो. मानखूर्द फ्लायओव्हरचे काम जून महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. मियावाकी जंगलांच्या प्रकल्पात आत्ता 56 हजार झाडे आहेत. याच ठिकाणी 1 लाख झाडे जगवण्याचे उद्दीष्ट आहे. कमी जागेत जास्त संख्येनं झाडं हे मियावाकी पद्धतीचं वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले. मुंबईत विकासकामे करतांना 16 प्लानिंग एजन्सी आहेत. अनेक एजन्सी असल्या की एक काम करतांना अनेक वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यापेक्षा एक एजन्सी असणं गरजेचं आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.


चायना बॉर्डर आहे का? 


शेतकरी आंदोलन आणि सेलिब्रीटी ट्विटवरही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मी जो दिल्लीच्या सीमेवरचा फोटो बघितला तो बघून मला वाटलं की चायना बॉर्डर आहे का? पण, ही शेतकऱ्यांना अडवण्यासाठीची तयारी होती. आता सेलिब्रिटींकडून ट्विट शेतकऱ्यांच्या बाजूने का होत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.