`या` पॉवरफुल नेत्यामुळे स्वराज्यरक्षक संभाजी पुन्हा टेलिव्हिजनवर
प्रेक्षकांच्या मागणीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात लोकांना विरंगुळा म्हणून लोकप्रिय मालिका पुन्हा टेलिव्हिजनवर दाखवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने दूरदर्शनवर नव्वदीच्या दशकातील रामायण आणि महाभारत या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला होता. मराठी वाहिन्यांवरही हा ट्रेंड सुरु होण्याची शक्यता आहे.
'ये अवतार नही ये इन्सान है...', 'शक्तिमान' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
कारण, 'झी मराठी' वाहिनीने स्वराज्यरक्षक संभाजी ही महाराष्ट्रभरात तुफान लोकप्रिय झालेली मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी प्रेक्षकांच्या मागणीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी 'झी मराठी वाहिनी'ला स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा टेलिव्हिजनवर दाखवण्याची विनंती केली होती.
या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या ट्विटवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. @PawarSpeaks शिवशंभूभक्तांच्या भावना वाहिनीकडे धन्यवाद, असे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. @PawarSpeaks हे शरद पवार यांचे ट्विटर हँडल आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पुढाकारामुळे 'झी मराठी'ने स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा सुरु केल्याचा निष्कर्ष अनेकांकडून काढला जात आहे.
३० मार्चपासून या मालिकेचे भाग पुन्हा 'झी मराठी'वर प्रसारित व्हायला सुरुवात झाली आहे. दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत मालिकेचे भाग दाखवले जात आहेत.