मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची हाक दिल्यापासून नागरिकांनी त्याला प्रतिसाद देत आणि कोरोनावर मात करणे साठी म्हणून घरातच राहण्याला प्राधान्य दिलं. पण, काही दिवसातच उरलेल्या जवळपास १५-२० दिवसांचं करायचं तरी काय असा प्रश्नही अनेकांना पडला.
काहींनी यामध्ये बैठ्या खेाळंचा आधार घेतला. तर काहींनी मनोरंजनासाठी वेब सीरिजच्या विश्वात प्रवेश केला. हा साठा संपत नाही तोच नव्वदच्या दशकातील अतिशय गाजलेल्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणणाचा निर्णय घेतला गेला. ज्याअंतर्गत 'महाभारत', 'रामायण', 'ब्योमकेश बक्शी', 'सर्कस' असे कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्येच सोशल मीडियावर अनेकांनीच आणखी काही मालिका पुन्हा सुरु करण्यात याव्यात असा सूर लगावला. ज्यामध्ये अग्रस्थानी नाव होतं ते म्हणजे 'शक्तिमान' या मालिकेचं.
मुकेश खन्ना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेत त्यांनी साकालेला गंगाधर आणि त्यांनीच साकारलेला शक्तिमान प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. असा हा शक्तिमान पुन्हा एकदा वाईटाचा अंत करण्यासाठी छोट्या पडद्याच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे.
Doordarshan is all set to telecast Shaktimaan, the famous serial featuring Mukesh Khanna, for 1-hour daily on DD National network from April 2020 at 1 PM: Government of India
— ANI (@ANI) March 30, 2020
सर्व चर्चांच्या गर्दीतच आता यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १ एप्रिलपासून दररोज दुपारी १ वाजता दूरदर्शनच्या डीडी नॅशनल या वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा, 'अदभुत अदम्य साहस की परिभाषा है,
ये मिटती मानवता की आशा है,
ये श्रृष्टि की शक्ति का वरदान है,
ये अवतार नहीं है ये इंसान है,
शक्तिमान.. शक्तिमान..शक्तिमान..', असा आवाज घराघरातून घुमणार असून प्रेक्षकांना एक वेगळा काळ आणि अनेकांनाच त्यांचं बालपण अनुभवणं शक्य होणार आहे.