मुंबई : गोवंडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये दमा आणि टीबीचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे. यामगे असलेलं मुख्य कारण म्हणजे बायोमेडिकल वेस्ट प्लांटमधून निघणारा विषारी धुर. हा धूर सध्या इथल्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. कारण गोवंडीत राहणाऱ्या अनेक रहिवाशांना प्लांटमधून होणाऱ्या विषारी उत्सर्जनामुळे श्वसनाचे आजार जडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील गोवंडीच्या रहिवाशांसाठी भागातील बायोमेडिकल वेस्ट प्लांटमधून बाहेर पडणारा विषारी धूर चिंतेचा विषय बनला आहे. रहिवाशांची होणारी हानी आणि दुर्दशा लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारने यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये बायोमेडिकल वेस्ट प्लांटचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारने अजूनपर्यंत पुनर्स्थापनेबाबत कोणतंही ठोस पाऊल उचलले नाही. 


बायोमेडिकल वेस्ट प्लांटचं स्थलांतर करण्यास होणारा विलंब लक्षात घेता, या परिसरात राहणारे स्थानिक राज्य सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत.  


विषारी धुरामुळे जडलेले आजार


बायोमेडिकल वेस्ट प्लांटमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे गोवंडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विविध संसर्ग जडले आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असून दम्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. तर टीबी रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलीये. यापूर्वी गोवंडीतून एका महिन्यात टीबीचे सुमारे 30 रुग्ण आढळून आले होते. परंतु, आता कारखान्यातून विषारी वायूंचं उत्सर्जन होत असल्याने ही संख्या 45 वर पोहोचली आहे. ही गंभीर चिंतेची बाब आहे.


रहिवाश्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती


स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. हवेतील विषारी वायू वणव्याप्रमाणे पसरत आहेत आणि शिवाजीनगर सारख्या शेजारच्या परिसरातील लोकांनाही त्रास होत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.