COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदीरातही हाच उत्साह पाहायला मिळतोय. आषाढी एकादशी निमित्त अनेक संकल्पनाही समोर येत आहेत. विठ्ठल आणि वारिवर आधारित अनेक गाणी युट्यूबवर पाहायला मिळत आहेत. या सर्वात दिव्यांग मुलांवर आधारित 'वारी स्पेशल' चर्चेत आहे. श्रीरंग संस्थेतर्फे दिव्यांग मुलांच्या दिंडीवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. पंढरपुरच्या वारीवर आतापर्यंत अनेक गाणी चित्रित झाली पण दिव्यांग मुलांना वारीचा अनुभव देत त्यांच्यावर चित्रित झालेले हे पहीले गाणे असल्याचे सांगण्यात येत आहे. 



नरेपार्क शाळेतील वातावरण सकाळपासून विठुमय झाले होते. वडाळाच्या विठ्ठल मंदीरातील वारकऱ्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. त्यानंतर विठ्ठल-रखुमाई आणि वारकरी बनलेल्या वारकऱ्यांनी आपल्या सामाजिक दिंडीला सुरुवात केली. या दिंडीसाठी विशेष विद्यार्थी पारंपारिक वेशात आले होते. माहीमच्या संस्कृती-रंग यांची पारंपारिक गाणी तसेच मंगळगौर यावेळी सादर झाली. पारंपारिक वेशात नटलेल्या या विद्यार्थ्यांनी सजवलेली विठ्ठलाची पालखी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या पालखीत तुळशीची रोप ठेवून दिव्यांग विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा सामाजिक संदेश दिला.


विठ्ठल ‘स्पेशल’ दिंडीवर आधारित गीताचे चित्रिकरण यावेळी करण्यात आले. मराठी सिनेसृष्टीतील कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून ही ‘स्पेशल’ दिंडी साकारली होती. या दिंडीवर चित्रित केले गेलेले गीत अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केले आहे. तर शिवहरी रानडे यांनी या गीताला संगीत दिले आहे. पार्श्वगायक जयदीप बगवाडकर आणि व्हायोलनिस्ट श्रुती भावे यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. संदेश कदम यांनी हे गीत तालबद्ध केले आहे. पराग सावंत यांनी हे गीत चित्रित केले असून अक्षय माने आणि अमित रुके यांनी या गाण्यासाठी दिंडीतील क्षण चित्रित केले आहेत. आरती कादवडकर, साक्षी खाडये आणि रोहन तिप्पे यांनी या गाण्यासाठी चित्रसहाय्य केले तर सौरभ नाईक यांनी संकलन केले आहे.



महाराष्ट्रातील इतकी मोठ संत परंपरा, इतका मोठा सण दिव्यांग विद्यार्थ्यांनाही अनुभवता यावा यासाठी हा अट्टाहास असल्याचे कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी सांगितले. वारीची आगळीवेगळी अनुभूती दिल्याने शाळेचे प्रशासकीय अधिकारी आणि सर्व शिक्षकांनी श्रीरंग संस्थेचे आभार मानले.