राणेंच्या भाजप प्रवेशावर अशोक चव्हाणांचं अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब
काँग्रेस नेते नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत.
मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या शिक्कामोर्तब केलं आहे. नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अशोक चव्हाण यांनी बोचरी टीका केली आहे.
पक्षातून कोणीही गेलं तरी नवीन नेतृत्व उभं राहतं. काही लोक दलबदलू आहेत. ते सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कोणी गेलं तर नवीन लोकांना संधी मिळेल, असं अशोक चव्हाण नारायण राणेंचं नाव न घेता म्हणालेत.
राज्यात मंत्रीमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झालीय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी त्याआधी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचं समजतंय.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं सरकारची बदनाम होत असल्यानं काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. त्यानंतर 8 ते 10 दिवसात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होतील. त्याआधी काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपात प्रवेश करतील, अशी चिन्हं आहेत. राणेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावून, महत्त्वाचं खातं दिले जाईल, असं भाजपमधील सूत्रांचं म्हणणं आहे.