मुंबई: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विनी भिडे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मुंबई मेट्रोच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. फडणवीस सरकारच्या काळात मुंबई मेट्रोचं काम जलदगतीनं करण्याचं श्रेय भिडे यांना जातं. महाविकास आघाडी सरकारनं त्यांना मेट्रोमधून हटवलं होतं. मात्र सत्तांतर होताच त्या पुन्हा मेट्रोमध्ये परतणार आहेत. आरे कारशेड आणि मेट्रोचं काम जलदगतीनं करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतल्याचं मानलं जातं आहे.


डिसेंबर 2019 मध्ये शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरून मतभेद झाले होते. महाविकास आघाडी सरकारने जानेवारी 2020 मध्ये त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस त्यांच्याकडे कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली. दोन महिन्यांनी म्हणजेच मे 2020 मध्ये भिडे यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.