मुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते तरुण.
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमधून अनेक ठिकाणांवर दहशतवादविरोधी पथकानं धाडी टाकून अटक केलेल्या ९ जणं हे दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते असं उघड झालं आहे. मंगळवारी पोलिसांनी औरंगाबादमधून ४ जणांना तर मुंब्र्यातून ५ जणांना अटक केली होती. अटक केलेल्या या तरुणांचा 'आयसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशय होता. गेल्या काही महिन्यांपासून एटीएसची यांच्यावर नजर होती. मुंब्र्याच्या कौसा या भागातून एटीएसने तिघांना ताब्यात घेतलं होतं. आयसिसशी संबंधावरून मजहर, मौशीम आणि फहर नावाच्या तिघांना ताब्यात घेतलं होतं. अटक केलेला एत तरुण हा फक्त १७ वर्षाचा आहे. काही तरुण हे उच्च शिक्षित असल्याचं देखील समोर आलं आहे.
दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्याआधीच एटीएसने यांना ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री एटीएसने काही जणांना अटक केली होती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाच्या संघटनेचा सलमान नावाचा एक तरूण मुंब्र्यात आला होता. सलमाननं या तिघांची भेट घेतली होती असं समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांच्या घरातून मोबाईल, लॅपटॉप आणि इतर कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्य़ाचं सावट पाहता एटीएसने कारवाई केली आहे. सुरक्षा य़ंत्रणांची प्रत्येक संशयित हालचालींवर कडक नजर आहे.