लोकल प्रवाशांना मोठा दिलासा; रेल्वे विभागाच्या एका निर्णयामुळं होणार मोठे बदल, काही दिवसातच...
Mumbai Railway : मध्य रेल्वेनं असा कोणता निर्णय घेतला, ज्यामुळं प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर होणार आहेत थेट परिणाम? कधीपासून होणार हे बदल?
Mumbai Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सगळ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. कधी लोकल उशिरा असण्याची समस्या तर कधी लोकलच्या बदलत्या वेळा. पण सगळ्यात मोठी कोणती समस्या असेल तर ती आहे गर्दीची. त्यात काही शहरातील रहिवाशांना किंवा रेल्वे प्रवाशांना असणारी एक समस्या म्हणजे प्लॅटफॉर्मची. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे येथे असलेल्या अनेक रेल्वे स्टेशनचं नुतनीकरण करत आहेत. कोणत्या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यात आली आहे तर कोणत्या प्लॅटफॉर्मला प्रवाशांसाठी काही सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यात आता मध्य रेल्वे आणखी एक निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासा सुखकर होणार आहे. नेमका असा रेल्वेनं कोणता निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊया.
हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. रोज कॉटन ग्रीन या स्थानकावरून हजारो लोक हे प्रवास करतात. तिथल्या प्रवाशांना एका समस्येला रोज सामोरं जावं लागतंय आणि ती म्हणजे फलाट आणि सीएसएमटीहून पनवेल आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या ट्रेन या ज्या फलाटावर अर्थात प्लॅटफॉर्मवर थांबतात ते प्लॅटफॉर्म हे उंचीला कमी आहेत. त्यामुळे ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेला फरकामुळे चढ-उतार करताना प्रवाशांना खूप त्रास होतो. याशिवाय अपघात होण्याची शक्यता ही वाढते. यावरून तिथल्या प्रवाशांनी अनेकदा तक्रार केल्यानंतर अखेर मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
या प्लॅटफॉर्मच्या उंची वाढवण्याची निविदा प्रक्रिया आता पूर्ण झाली असून लवकरच प्लॅटफॉर्म क्रमांक एकची उंची वाढवण्याचं काम सुरु होणार आहे. यानंतर अपघात होणार नाही अशी आशा प्रवाशांना आहे. कॉटन ग्रीन या रेल्वे स्थानकातील अनेक समस्येवर उपाय केल्यानंतर हार्बर मार्गावर इतर रेल्वे स्थानकांवरील समस्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी-पनवेल मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.