मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांचा ताफा अडवल्याविषयी प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा असते, पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नियोजित कार्यक्रमामुसार ते हेलिकॉप्टरने सभेला जाणार होते परंतु अचानक त्यात बदल करून ते रस्ते मार्गाने निघाले. 


पंजाबमध्ये आधीपासूनच शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे याची त्यांना जाणीव असेलच. मोदींच्या सभेला गर्दी जमली नाही त्यामुळे त्यांना सभा सद्द करावी लागली. पण खोटी माहिती पसरवून सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपाकडून खटाटोप केला जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.


सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा कांगावा करत पंजाबमधील काँग्रेस सरकारवर दोष देण्याचा भाजापाचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सुरक्षेचाच मुद्दा विचारात घेतला तर गांधी कुटुंबाच्या जिवीताला नेहमीच धोका राहिला आहे. या कुटुंबाने देशासाठी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या रुपाने दोन बलिदान दिली आहेत. 


तरीही सोनिया गांधी, राहुल गांधी जनतेत सामिल होतात, सुरक्षेची चिंता न करता सामान्य लोकांमध्ये मिसळतात. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. उत्तर प्रदेशातील पीडित कुटुंबाला भेटण्यास जाताना राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेची काय परिस्थिती होती? प्रियंका गांधी यांच्याशी पुरुष पोलिसांनी धक्कुक्की केली होती हे भाजपा विसरले काय? त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कोणी केली होती? कोणाच्या इशाऱ्यावर राहुल व प्रियंका यांना अडवण्यात आले होते? याचे उत्तरही भाजपाने द्यावं, असं प्रदेशाध्यक्ष म्हणाले.