`त्यांच्यासोबत` सरकार चालवल्यामुळं माझ्या डोक्यावरचे केस उडाले, चंद्रकांत पाटील यांचा टोला
त्यांचं सरकार किती दिवस आहे माहित नाही, रोज सकाळी पडतंय पडतंय असं वाटतं, आणि संध्याकाळ होता होता, पुन्हा स्थिर होतं
मुंबई : भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्ष त्यांच्याबरोबर पाच वर्ष सरकारमध्ये होता. पण सरकारमध्ये सोबत असतानाही रोज भांडणं, रोज शिव्या-शाप, रोज बाहेर पडण्याची भाषा आणि रोज राजीनाम्याची भाषा केली जायची. सकाळी उठले की संजय राऊत जॅकिट सावरत यायचे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
माझ्याकडं तेव्हा आठ खाती होती. त्यांच्यासोबत सरकार चालवल्यामुळं माझ्या डोक्यावरचे केस उडाले,' अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेवर हल्लाबोल केला.
ओबीसीच्या मुद्द्यावरूनही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 'एकतर अनेक विषयांमधलं ह्यांना काही कळत नाही. खोडा घालायचा एवढंच कळतं. त्यामुळं आपल्याला आपल्या ताकदीवर एकहाती सरकार आणायचं आहे. फेब्रुवारीची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय करायची असा सरकारचा प्लान आहे. एकदा का निवडणूक झाली की पाच वर्षे काहीही होऊ शकणार नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. पण त्यांचा हा प्लान यशस्वी होऊ द्यायचा नाही,' असं आवाहन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.
त्यांचं सरकार किती दिवस आहे माहित नाही, रोज सकाळी पडतंय पडतंय असं वाटतं, आणि संध्याकाळ होता होता, पुन्हा स्थिर होतं, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
मराठा आरक्षण देताना भाजपने धाडस दाखवलं. मराठा आरक्षण तर आम्ही देऊ पण मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसी आरक्षणाला हात लावणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी ते व्यवहारात आणलं. वेगळं SEBC आरक्षण आणलं ते हायकोर्टात टिकवलं, ते सुप्रीम कोर्टात टिकवलं. पण या नाकर्त्या सरकारला ते टिकवता आलं नाही, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
आमच्या मनात ओबीसीबद्दल खोट नाही तर श्रद्धा आहे, प्रेम आहे. इतर समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्यानंतर ज्या पाच जिल्ह्यांच्या निवडणुका घोषित झाल्या, त्यात कुठलाही विचार न करता भाजपने घोषित केलं की या जागांवर ओबीसी उमेदवारच उभे करणार. ओबीसी आरक्षण गेल्यावर ओपनला संधी असतानाही ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, हे सर्व लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
केंद्राने डाटा द्यावा हे राज्य सरकारचं म्हणणं खरं आहे तर छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला का गेले होते? आम्हालाही पटतं की राज्याची जबाबदारी आहे, आता पुढे कसं करायचं ते सांगा, अशी विनंती छगन भुजबळ यांनी फडणवीस यांच्याकडे केल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.